हिंदू - मुस्लिम ऐक्यासाठी त्योहार मिलन उपक्रम
समाजातील एकता टिकवून ठेवण्यात खारीचा वाटा
सोलापूर प्रतिनिधी , ता. 3 : विविध धर्म, संस्कृती, विचार यांच्या विविधतेत एकता असलेला हा देश आहे. हिंदू - मुस्लिम दंगालीनंतर समाजातील एकता टिकवून ठेवण्यात खारीचा वाटा उचलण्यासाठी त्योहार मिलन या संस्थेची स्थापना केली. ईद नंतर येणारा प्रत्येक सण - उत्सव सर्वधार्मियासोबत साजरा करण्यात येते. गेली 20 वर्षांपासून हा उपक्रम सुरु असल्याचे ट्रस्ट अध्यक्ष रियाज खरादी यांनी सांगितले. भारतीय लोकांच्या विचारसरणीनुसार, धार्मिक सहिष्णुता हा त्यांच्या राष्ट्राच्या अस्तित्वाचा मध्यवर्ती गाभा आहे. सर्व धर्मांचा आदर करणे अतिशय महत्त्वाचे आहे. सामाजिक मूल्यांसोबत, धार्मिक अंतर ओलांडून जाणाऱ्या अनेक समजुती प्रचलित आहेत. भारतात हिंदू, मुसलमान यांच्यासह अनेक ख्रिश्चन, जैन इतर जाती पंथाचे लोक राहतात. प्रत्येक धर्मग्रंथामधील उपदेश हे कर्मावर विश्वास ठेवणारे आहेत. सगळ्यांचा भगवान एकच आहे. वेगवेगळ्या रूपात, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा इतिहास आहे. आत्मशांतीसाठी प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या प्रकारची श्रद्धा, विश्वास मनात बाळगते एवढेच. सर्व प्रमुख धार्मिक पार्श्वभूमीचे, प्रचंड बहुसंख्येतील भारतीय म्हणतात की, आपल्याहून वयाने मोठ्या असलेल्या व्यक्तींचा मान राखणे ही गोष्ट त्यांच्या श्रद्धेसाठी अत्यंत महत्त्वाची आहे.तरीही, काही विशिष्ट मूल्ये आणि धार्मिक निष्ठा समान असताना तसेच एकाच देशामध्ये, एकाच संविधानाखाली राहत असताना भारताच्या प्रमुख धार्मिक समाजांच्या सदस्यांना पुष्कळदा त्यांच्यात खूप काही साम्य आहे असे वाटत नाही. बहुतांश हिंदू स्वतःला मुस्लिमांपेक्षा अत्यंत भिन्न समजतात आणि बहुतेक मुस्लिमांची देखील ते हिंदूंपेक्षा अत्यंत भिन्न असल्याची तीच भावना आहे . यातील भिन्नता एकत्रित करण्याचा प्रयत्न त्योहार मिलनच्या माध्यमातून करण्यात येत आहे. सोलापुरात 2002 मध्ये झालेल्या दंगलीनंतर हिंदू मुस्लिम ऐक्य टिकविण्याची गरज प्रखरतेने जाणवले. त्यानंतर आझाद येज्युकेशन ट्रस्टच्या वतीने त्योहार मिलन हा उपक्रम सुरु केला. गेल्या 20 वर्षापासून भारताच्या धार्मिक गटांमध्ये भिन्नतेचा हा दृष्टीकोन एकतामध्ये बदलण्यासाठी खारीचा वाटा उचलत आहे.