डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य यांचा 13 मे रोजी होणार पट्टाभिषेक
काशी येथे 42 दिवस धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
सोलापूर : सदाचार, विद्यावंत, बहुभाषिक आणि धर्म प्रचारक असलेले धर्मरत्न डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य यांची काशी ज्ञान सिंहासनाच्या पीठावर उत्तराधिकारी म्हणून निवड करण्यात आली असून शुक्रवारी 13 मे रोजी पंच जगद्गुरुंच्या दिव्य सानिध्यात यांचा भव्य पट्टाभिषेक सोहळा वाराणसी काशी येथे आयोजित करण्यात आला आहे. तसेच यानिमित्त शनिवार 2 एप्रिल गुढीपाडव्यापासून बेचाळीस दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याचे काशी पीठाचे जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांनी सांगितले.
बुधवारी अक्कलकोट रस्त्यावरील वीरतपस्वी मंदिरात आयोजित धर्मसभेत काशी जगद्गुरुंनी ही माहिती दिली. यावेळी मंद्रूपचे रेणुक शिवाचार्य, नागणसूरचे श्रीकंठ शिवाचार्य, चिटगुप्पाचे गुरुलिंग शिवाचार्य, मैंदर्गीचे नीलकंठ शिवाचार्य, सुगरेश्वर शिवाचार्य, जिंतूरचे अमृतेश्वर शिवाचार्य यांच्यासह आमदार विजयकुमार देशमुख, माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे, विश्वनाथ चाकोते, बाजार समिती माजी सभापती इंदुमती आलगोंड, सचालक केदार उंबरजे, सिद्धेश्वर बमणी, सिद्धाराम चाकोते हरीश पाटील रामाप्पा चिवडशेट्टी, बसवराज शास्त्री हिरेमठ शिवयोगी शास्त्री होळी मठ यांच्यासह होटगी, कुंभारी, दर्गनहळळी, धोत्री, मुस्ती, बोरामणी आदी गावातील भक्तगण उपस्थित होते.
प्रास्ताविकात सिद्धय्या स्वामी यांनी काशी पीठावर होटगी महास्वामीजींची निवड करून काशी जगद्गुरुंनी सोलापूरकरांचा गौरव केल्याचे सांगितले. काशी पीठाचे उत्तराधिकारी जाहीर केल्यानंतर पहिल्यांदाच होटगी संस्थेत आगमन झालेल्या काशी जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांचे संस्थेतर्फे भव्य स्वागत करून डॉ मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
यावेळी काशी जगद्गुरु म्हणाले आयुष्यभर कष्ट करून संपादन केलेले सर्वकाही वडील आपल्या मुलांच्या हाती सोपवून निवृत्त होतात. त्याप्रमाणे पीठाचे सुद्धा उत्तराधिकाऱ्यांची निवड करून त्यांच्याकडून होत असलेले धर्म कार्य पाहून आनंदीत होतात. 32 वर्षापूर्वी माझी काशी पिठावर निवड झाली होती. समाजासाठी जे जे शक्य आहेत ते आपण केले आहे पीठारोहण करताना अनेक अडचणी वादविवादाचे प्रसंग उद्भवतात. त्यामुळे हयात असताना योग्य व्यक्तीस जबाबदारी देऊन त्यांना मार्गदर्शन करीत यांच्याकडून धर्मकार्य करून घेण्याचा मानस असल्याचे जगद्गुरुंनी स्पष्ट केले. डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य यांच्या रूपाने काशीपीठास 87 वे जगद्गुरु लागणार आहेत. काशी पीठावर तपस्वी आणि ज्ञानी जगद्गुरु होऊन गेले आहेत.
जंगमवाडी मठ आज सुमारे दोन हजार भक्तगणांच्या निवास आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. काशी पीठाची परंपरा फार मोठी आहे त्याचप्रमाणे होटगी मठाची तपस्वी परंपरा असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी काशी पीठाचे उत्तराधिकारी व होटगी मठाचे मठाधिपती डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य म्हणाले की तपोरत्नं योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांनी पंचपीठाधीश्वरांच्या केलेल्या सेवे मुळेच मला ही संधी मिळाली असावी. काशी जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या मार्गदर्शनाखालीच माझे पी.एच.डी.चे शिक्षण पूर्ण झाले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली काशी पीठाची जबाबदारी समर्थपणे पार पाडण्याचा प्रयत्न करणार आहे. काशी महास्वामीजींचा अमृतमहोत्सव व पट्टाभिषेक सोहळ्यात भक्तांनी तन-मन-धनाने सेवा करावी.
यावेळी म्हेत्रे, देशमुख व चाकोते यांनी डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य यांचा पट्टाभिषेक सोहळा भव्य दिव्य साजरा करण्याचा संकल्प असून त्यासाठी सोलापूरकरांनी तन-मन-धनाने सहभागी व्हावे असे आवाहन केले. यावेळी मंद्रूपचे रेणुक शिवाचार्य, बसवराज शास्त्री यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी पक्षनेता शिवानंद पाटील, प्राचार्य गजानन धरणे, डॉ. राजेंद्र घुळी, तम्मा मसरे, राजशेखर हिरेहब्बू, सुधीर थोबडे, महेश अंदेली, चिदानंद मुस्तारे, राजशेखर बुरकुले, प्रभूराज विभुते आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे सचिव शांतय्या स्वामी यांनी केले तर आभार राजकुमार भोरे यांनी मानले.