प्रशासनाच्या कारभारावर आमदारांनी ओढले ताशेरे
पाणीपुरवठा, वाढीव कर, गुंठेवारी आदी विषयांवर आयुक्तांना धरले धारेवर
सोलापूर प्रतिनिधी, ता. ३ : शहरातील विस्कळीत पाणीपुरवठा, रिव्हजननंतर लावलेले वाढीव कर, गुंठेवारी बांधकाम परवानगी आदींच्या माध्यमातून शहराला वेठीस धरण्याचे काम प्रशासन करीत आहे. काही भागात २४ तास पाणी, तर काही ठिकाणी सहा दिवसाआड पाणी असा दुजाभाव कशासाठी, असा सवाल उपस्थित करीत प्रशासनाच्या कारभारावर आमदार विजयकुमार देशमुख यांनी ताशेरे ओढले. मागील दोन महिन्यांपासून शहरात झालेली विस्कळीत पाणीपुरवठाचा अतिरेक आणि नागरिकांना दिलेल्या वाढीव कर बिलांसदर्भात आमदार विजयकुमार देशमुख यांनी शहराध्यक्ष, माजी नगरसेवकांसोबत आयुक्त पी. शिवशंकर यांची भेट घेतली. प्रशासकीय कारभारात नागरिकांच्या समस्या सोडविण्यावर भर देण्याऐवजी अधिकाऱ्यांची मनमानी सुरू झाली आहे. ठराविक प्रभागात चोवीस तास पाणी असते आणि काही भागात सहा दिवसाआड पाणीपुरवठा होतो. सर्व नागरिक पाण्याचे बिल भरतात, सगळ्यांना समान न्याय देण्याचे काम प्रशासनाचे आहे. कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता प्रामाणिकपणे काम करणे ही प्रशासकाची भूमिका असली पाहिजे. मागील दोन महिन्यामध्ये अधिकाऱ्यांकडून दुजाभाव होत असल्याचे प्रखरतेने दिसून येते. नव्याने आकरणी कर बिलाबाबतही नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. कर्मचाऱ्यांकडून झालेल्या रिव्हिजनमध्ये अनेक त्रुटी आहेत. करवाढीसंदर्भात नोटिसा देऊन तडजोड करण्याचा घाट घातला जात आहे. गुंठेवारीबाबत चालढकल केली जात आहे. सत्ताधारी भाजपला बदनाम करण्याचे कटकारस्थान महापालिका प्रशासनाकडून होत आहे. याकडे जातीने लक्ष घालावे, नागरिकांना नाहक त्रास देउ नका, आम्हाला आमची रणनिती वापरण्याची वेळ आणू नका. कोरोनानंतर आता कुठे अनेकांचे कुटुंब सावरत आहेत, त्यात प्रशासनाचा कर वाढ हे सर्वसामान्यांच्या आवाक्यबाहेरील आहेत, याचा फेरविचार व्हावा, असेही आमदार देशमुख यांनी आयुक्तांना ठणकावून सांगितले. यावेळी शहराध्यक्ष विक्रम देशमुख, माजी नगरसेवक शिवानंद पाटील, किरण देशमुख, चंद्रकांत पाटील, कल्पना कारभारी, सरचिटणीस रुद्रेश बोरामणी आदी उपस्थित होते.
-------
रणनिती आखण्याची वेळ आणू नका...
महापालिकेत प्रशासकराज आल्यापासून जनतेला त्रास देण्याचे काम सुरु आहे. प्रशासकसाहेब तुम्ही महाविकास सरकारचे प्रतिनिधित्व करुन भाजपला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करीत आहात का? प्रशासन आम्हाला अडचणीत आणण्याचा जाणूनबुजून प्रयत्न करीत असेल तर आम्हीदेखील आमची रणनीती आखल्याशिवाय राहणार नाही, तशी वेळ आणू नका, असा इशारादेखील आमदार देशमुख यांनी पी. शिवशंकर यांना दिला.
शहरासाठी मुबलक पाणी उपलब्ध असले तरी वितरण व्यवस्थेमध्ये त्रुटी आहेत. महावितरण महामंडळाची बैठक घेउन लोडशेडिंगबाबत चर्चा करण्यात येईल. शहर पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी आवश्यक तांत्रिक बाबींची पूर्तता करण्याचे काम अमृत योजनेंतर्गत सुरू आहे. यावर त्वरित तोडगा काढण्यात येईल, असे आयुक्त पी. शिवशंकर यांनी सांगितले.