होम मैदानावर केबलचे ८ बंडल जळून खाक

दोन अल्पवयीन मुलांनी लावली आग;

सोलापूर, ता. १५ : होम मैदानावर इलेक्ट्रिकल साहित्य घेऊन काडीपेटीने दोन अल्पवयीन मुलांनी आग लावली. तो भडका जवळच असलेल्या ओएफसी फायबर केबलच्या बंडलला लागला. या आगीत ८ केबल बंडल जळून खाक झाले. दोन ड्रम फोम केमिकल आणि चार गाड्यांच्या पाणी फवारणीनंतर तासाभरात आग आटोक्यात आली. दोन मुले सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, त्याचे फुटेज महापालिकेने पोलिसांकडे दिले आहेत. 
महापालिकेच्या वतीने शहर हद्दीत १०० किमी अंतरावर डक्टमधून ओएफसी केबल घालण्यासाठी मक्तेदारांनी एक हजार फायबर केबलचे बंडल होम मैदानावर ठेवले होते. त्यातील काही काम झाले आहे. दरम्यान तेथील फायबर केबल बंडलला मंगळवारी दुपारी पावणेएकच्या सुमारास आग लागली. आग मोठी असली तरी ही मोकळे मैदान असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, याठिकाणी असलेल्या एकूण फायबर केबलच्या बंडलमधील एकावर एक रचलेले तब्बल ८ केबल बंडल आगीमध्ये भस्मसात झाले आहेत. या आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाकडून घटनास्थळी चार पाण्याच्या गाड्या दाखल झाल्या. या पाण्यात फोम केमिकल घालून पाण्याचा मारा करण्यात आला. त्यामुळे रणरणत्या उन्हात भडकलेली आग आटोक्यात आणण्यास मदत झाली. या आगीत मक्तेदाराचे साधारण अडीच लाखांचे नुकसान झाले असल्याची प्राथमिक माहिती महापालिका प्रशासनाने दिली. 
---
होम मैदानावर आग लागल्यासंबंधीची माहिती फोनवरून अग्निशामक दलाकडे प्राप्त झाली. ताबडतोब पाण्याच्या गाड्या दाखल झाल्या. एकावर एक केबल बंडल रचल्याने आगीने मोठा भडका घेतला होता. केमिकलचा वापर करून आग लवकर आटोक्यात आणली गेली. त्यामुळे आजूबाजूला अस्थाव्यस्थ पडलेले केबल बंडल सुरक्षित राहिले आहेत. 
- केदार आवटे, अग्निशामक विभागप्रमुख 
---- 

केबलच्या एका बंडलमध्ये साधारण १०० मीटरचे काम होते. असे एकूण ८ बंडल आगीत जळून खाक झाले आहेत. एकूण बंडल आणि जळालेले व अस्तित्वात असलेले याची तपासणी केली. बाकी सर्व सुरक्षित आहेत. येत्या दोन दिवसांत जेथे काम चालू आहे. त्याठिकाणी हे मटेरियल नेण्यात येईल. 
- संदीप कारंजे, नगरअभियंता 
---- 

होम मैदानावरील टेलिकॉम कंपन्यांची केबल हटवून त्याठिकाणी वॉकिंगसाठी येणाऱ्यांची अडचण दूर करावी. केबलमुळे तेथे अस्वच्छता असल्याची बाब नगरअभियंता संदीप कारंजे यांच्यासह इतर अधिकाऱ्यांना त्याचवेळी निदर्शनास आणून दिली होती. अद्यापही केबल तेथून काढण्यात आले नसल्याची बाब आगीच्या घटनेनंतर समोर आली. अधिकाऱ्यांच्या दिरंगाईमुळे शहरातील नागरिकांना त्रास सोसावा लागत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. 
- श्रीदेवी फुलारे, माजी नगरसेविका