महापालिकेकडून भूमीअभिलेख विभागाला नोटीस

नियोजित आराखड्यानुसार उद्यान होणार : आयुक्त

सोलापूर, ता. १५ : महापालिका प्रशासन नगररचना विभागाकडे उपलब्ध विकास आराखड्यानुसार उद्यान विकसित केले आहे. भूमीअभिलेख विभागाकडून जागेच्या ताब्यानुसार मोजणी नकाशा तयार केली नाही. त्यामुळे महापालिकेकडून भूमीअभिलेख विभागाच्या संबंधित अधिकाऱ्याला नोटीस बजावून दुरुस्ती करण्याच्या सूचना दिल्याची माहिती आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली. 
जुळे सोलापूर परिसरात उद्यानासाठी आरक्ष्ित जागेवर महात्मा बसवेश्वर उद्यान बनविण्यात येत आहे. शासन आदेशानुसार जागेच्या मूळ मालकाकडून विनामूल्य तीन हजार चौरस मीटर इतकी जागा सन २०१७ मध्ये महापालिकेच्या ताब्यात देण्यात आली. शासनाच्या नियमाप्रमाणे महापालिकेनी जागा ताब्यात घेतली होती. येथील उद्यानासाठी उपमहापौर राजेश काळे यांनी निधी दिला. महापालिकेने ताब्यात घेतलेल्या जागेच्या विकास आराखड्यानुसार उद्यान विकसित करण्याचे काम सुरू झाले. दरम्यान लोकमंगल संस्थेकडून उद्यानाचे काम रोखण्यात आले. जागेची मोजणी करण्याची मागणी जुळे सोलापुरातील नागरिकांनी व महापालिकेनी केली. महापालिकेने मोजणीचे पैसे भरले. उद्यान जागेची मोजणी करण्यात आली. दरम्यान महापालिकेची विकास आराखडा हा शासनाच्या नियमानुसार असून भूमीअभिलेख विभागातील अधिकाऱ्यांनी यामध्ये फेरबदल केल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे संबंधित विभागाला महापालिकेकडून नोटीस देण्यात आली आहे. चुकीच्या मोजणीची दुरुस्ती करून महापालिकेच्या डिपीआरनुसार मोजणी आराखडा तयार करण्यासंबंधीचे सूचना दिले आहेत. महापालिकेच्या नियोजित आराखड्यानुसार उद्यान विकसित होईल, असे आयुक़्त पी. शिवशंकर यांनी सांगितले.